मुक्ताईनगर : प्रतिनिधी
भुसावळ रस्त्यावरील सियाराम ढाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मुक्ताईनगर येथील तरुण जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारी रात्री उशिरा घडली.मृत तरुणाचे नाव नीलेश सुपडू डवले (२८) असे आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दीपक राजपूत यांची मोटारसायकल घेऊन क्रमांक (एम.एच. १९ डी.पी. ७४७७) बाहेर गेला होता. दरम्यान रात्री भुसावळ रस्त्यावरील सियाराम ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात नीलेशचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला आहे.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात मुकेश डवले यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत. या संदर्भात घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टिकोनातून तपास करण्यात यावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे