अमळनेर : प्रतिनिधी
उसनवारीचे पैसे घेण्यासाठी चोपड्याहून आलेल्या एका इसमाला दोघांनी मारहाण करून त्याच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना धुळे रस्त्याला घडली आहे. या दोघांवर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सुदाम महाजन याने ३ महिन्यांपूर्वी सुनील मनोहर सोनगिरे रा. चोपडा यांच्याकडून दीड लाख रुपये उसनवारीने मागितले होते. त्यातील ३० हजार रुपये घेण्यासाठी ८ डिसेंबर रोजी साडेपाच वाजता चोपड्याहून बोलवून घेतले. सायंकाळी ७ वाजेला पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर महेंद्र महाजन आणि त्याचा मित्र दीपक मराठे यांनी सोनगिरे यांना पैशांसाठी वारंवार तगादा लावतो, असे सांगत मारहाण केली. दोघेही दुचाकीवर निघून गेले. जखमी सोनगिरे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर दोन दिवसांनी सोनगीरे यांनी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.