पारोळा : प्रतिनिधी
कापूस घेण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याने मापात फसवणूक केल्याने त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. ही घटना आडगाव, ता. पारोळा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी शेकडो ग्रामस्थ एकत्र जमले होते. पोलिस वेळीच पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील आडगाव येथे कापूस घेण्यासाठी पारोळा शहरातील व्यापारी आले होते. मात्र, कापूस घेताना ते मापात फसवणूक करीत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. याबद्दल ग्रामस्थांनी व्यापाऱ्याकडे विचारणा केली. मात्र, व्यापाऱ्याने उडवा- उडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी थेट व्यापाऱ्यालाच चोप देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गावात जमावही जमला होता. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही घटना पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने पुढील अनर्थ टळला.