जळगाव : प्रतिनिधी
नाताळच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने येथील बेकरींसह अन्य आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीत साठवणूक केलेला ३ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ख्रिसमस व नववर्षाच्या आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे. अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके, के. एच. बाविस्कर, श.म. पवार यांनी ही कारवाई केली. स्वच्छता न पाळणाऱ्या बेकरींवरह तीव्र कारवाई करणार असल्याच माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी दुपारी ४ वाजता मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी या पेढीच्या तपासणीत मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा साठा आढळला. २,७९२ किलो वजनाचा आणि ३ लाख ३१ हजार ४४० रुपयांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. या अन्न पदार्थावर पॅकिंग तारीख तसेच बिलाचा उल्लेख नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.