यावल : प्रतिनिधी
अंकलेश्वर ब-हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडे जाताना साकळी गावाच्या पुढील वळणावर दुचाकीला वाचवण्याच्या बेतात ट्रक रस्त्यावर उलटला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ट्रकमधील साहित्य रस्त्यावर पसरले होते. परिणामी रहदारीला अडचण निर्माण होत वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर उलटलेले वाहन बाजूला करून रस्ता मोकळा केला. मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर-ब-हाणपूर राज्य मार्गावर यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकळी गावाच्या पुढे वळण आहे. या वळणावरून दुचाकीने (एम. एच १९/सी.बी. ९०२९) एक जण जात होता. भरधाव वेगात जात असताना वळणावर अचानक चोपडाकडून यावलकडे येत असलेला ट्रक (जी. जे. २३/ए. डब्ल्यू, ९९००) हा समोर आला. दरम्यान दुचाकी ट्रकला धडक देणार तोच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी चालकाला वाचवण्यासाठी वाहन अचानक वळवले. मात्र, यात वाहन रस्त्यावरच उलटले. या अपघातामध्ये ट्रकचालक व दुचाकी स्वार हे दोघे जखमी झाले.
अपघातस्थळावरून जात असताना यावल येथील पराग सराफ, किनगाव येथील अनिस तडवी आदीनी जखमींना मदत केली व त्यांना रुग्णालयात हलवले. रस्त्यावर ट्रकमधील साहित्य पसरले होते. परिणामी रहदारीस अडचण निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हर्षद गवळी, संतोष पाटील घटनास्थळावर दाखल झाले. क्रेनच्या साह्याने रस्त्यात उलटलेला हा ट्रक बाजूला करण्यात आला व साहित्य एका ठिकाणी जमा करण्यात आले. रहदारीसाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला.