जामनेर : प्रतिनिधी
जामनेरनजीक बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या तीन अपघातात चारजण ठार झाले. रस्त्यात टाकलेल्या मक्यावरून दुचाकी घसरली. याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसून मेहुणे आणि शालक असे दोनजण, दुसऱ्या अपघातात बंद पडलेल्या एका वाहनावर मागून आलेले दुसरे वाहन धडकले, यात तिसरा ठार झाला; तर ट्रॅक्टर चालविताना तोल गेल्याने चाकाखाली येऊन चालक ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या अपघातात शंकर भगवान चौधरी (३५, रा. धुळे) आणि मयूर गणेश चौधरी (२५, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) हे मेहुणे आणि शालक, तर दुसऱ्या अपघातात शेख कलीम शेख मोहम्मद (५०, रा. शिवना, ता. सिल्लोड) हे ठार झाले. तिसऱ्या अपघातात सल्लाउद्दीन जैन उद्दीन शेख (३२) हे ठार झाले आहेत. यापैकी दोन अपघात बुधवारी रात्री झाले. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिसरा अपघात गुरुवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पहूरनजीक झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीने तीनजण जामनेरहून पहूरकडे येत होते. त्याचवेळी राजश्री जिनिंगजवळ रस्त्यावर सुकण्यासाठी टाकलेल्या मक्यावरून दुचाकी घसरली. यादरम्यान पहूरहून जामनेरकडे जाणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक बसली. यात शंकर चौधरी व मयूर चौधरी हे दोनजण ठार, तर मयूर देवेंद्र गढरी (२५, रा. शेंदुर्णी) हा जखमी झाला आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप, हेडकॉन्स्टेबल जिजाबराव कोकणे, रवी मोरे, वैभव देशमुख यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. या घटनेने शेंदुर्णी गावात शोककळा पसरली आहे. रघुनाथ विठ्ठल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यापारी पंकज लोढा (४३) व वाहनचालक शेख सलीम शेख याकुब (४५, रा. शिवना, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात बुधवारी रात्री १२ वाजता घडला.
शिवना येथून पहूरकडे जाणारा टेम्पो पहूरनजीक अचानक बंद पडला. त्याचवेळी मागून आलेल्या दुसऱ्या वाहनाने त्याला धडक दिली. यात टेम्पोचालक शे. कलीम शेख हा जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री १०:३० वाजता घडला. या प्रकरणी चालक संजय श्यामराव जाधव (४५, रा. चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रैक्टर चालविताना तोल गेल्याने चाकाखाली येऊन चालक ठार झाला. ही घटना शेंदुर्णी – पाचोरा रस्त्यावर गुरुवारी दुपारी घडली. सल्लाउद्दीन जैन उद्दीन शेख (३२) असे मयत युवकाचे नाव आहे. दुसरीकडे जामनेर रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन शिवा शंकर सरताळे (३३) व राहुल नागो तेली (रा. वाकी, ता. जामनेर) हे गंभीर जखमी झाले.