मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केली असून यात मुख्यमंत्री पदी देवेद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांची वर्णी लागली आहे तर दुसरीकडे शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीमुळे पवार कुटुंबात मनोमिलनाचे पर्व सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता शिवसेनाही त्याच मार्गाने पुढे जाण्याची शक्यता वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यासंबंधी एक महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे. तसे शिवसेनेतही कुणीतरी टाळी देण्यास तयार हवे, असे ते म्हणालेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असताना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी तुटलेले नाते कसे जोडावे हे शरद पवारांकडून शिकण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. एकप्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच उद्देशून हे विधान केल्याचा दावा केला जात आहे.
संजय शिरसाट गुरुवारी ‘झी 24 तास’शी शरद व अजित पवारांच्या भेटीवर भाष्य करताना म्हणाले की, ते एकत्र आले तर शिवसेना त्यांचे अभिनंदनच करेल. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आम्ही भांडण लावणारे नाही तर जोडणारे लोक आहोत. नाते जोडणे हे शरद पवाराकंडून शिकावे. यावेळी पत्रकाराने त्यांना तुमच्यात म्हणजे शिवसेनेत असे व्हावे असे वाटत नाही का? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले की, आम्हाला वाटून काय उपयोग? टाळी दोन्ही हातांनी वाजण्याची गरज आहे. त्यांच्या (राष्ट्रवादी) टाळ्याही वाजतात व गळ्यात हारही घालतात. आमचे सोडून द्या, पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे.
त्यांच्या या विधानंतर पत्रकाराने तुम्ही टाळी देण्यास तयार आहात का? असा उलटप्रश्न केला. त्यावर आम्ही काय करू हे नंतरचा भाग आहे. आज शरद पवारांचा दिवस आहे, त्यामुळे आपण त्यावरच बोलू, असे संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांच्या ‘टाळी दोन्ही हातांनी वाजण्याची गरज आहे’, या विधानामुळे आता एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे आपसातील कटुता विसरून एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.