जळगाव : प्रतिनिधी
नगररचना विभागातील १५ हजारांच्या लाचप्रकरणी सहायक संचालक दिघेश तायडे यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली. दुसरीकडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे बुधवारी संध्याकाळी चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नगररचना विभागातील रचना सहायक मनोज वन्नेरे याला १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्याने महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व नगररचना विभागाचे सहायक संचालक दिघेश तायडे यांच्या नावाने लाच घेतल्याचे सांगितले होते. दरम्यान, लाचखोर वन्नेरे याने दोन प्रकरणात १५ हजार, तर अन्य जुन्या प्रकरणात चार हजारांची लाच स्वीकारल्याचे संभाषण ध्वनिमुद्रित झाले आहे. या संभाषणातील मजकुरानुसार चौकशीमध्ये विचारणा करण्यात आली. तसेच क्लिपमधील संभाषणाच्या वक्तव्य आणि जबाब याची जुळवणी करण्यात आली.