परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर काचेच्या आवरणात संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. या प्रतिकृतीची काच एका व्यक्तीने फोडली. त्यावरून आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे. या घटनेचे परभणीत तीव्र पडसाद उमटलेत. बुधवारच्या परभणी बंदमध्ये आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच काही गाड्यांचीही जाळपोळ केली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला उपरोक्त इशारा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप केला आहे. प्रस्तुत घटनेतील समाजकंटकांना 24 तासांत अटक करा, अन्यथा परिणामास तयार राहा, असा इशारा आंबेडकरांनी या प्रकरणी दिला आहे.
परभणीत मराठा जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय राज्य घटनेची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हा कार्याकर्त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या विरोध प्रदर्शनामुळे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून एका समाजकंटकाला अटक केली. मी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढील 24 तासांत आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आंबेडकरांनी या प्रकरणी पोलिस प्रशासनाला दिला आहे.