परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील परभणीतील बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
दरम्यान, आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला.
परभणी शहर बंद दरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही मोर्चेकरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे.
परभणीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांकडून पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.