जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका सराफा व्यापाऱ्याला एरंडोल गावानजीक रस्त्यातच गाठत अज्ञात तीन दरोडेखोरांनी मारहाण करीत चार किलो चांदीसह दुचाकी व मोबाईल असा एकुण ९ लाखांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री रहिवासी सराफा व्यावसायीक राजेंद्र बबनशेठ विसपुते यांचे एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे समर्थकृपा नावाचे सराफा दुकान आहे. सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी २ वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यानुसार आज बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर लक्ष ठेवून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांनी दोन दुचाकींवर येवून चोरटक्के गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर राजेंद्र विसपुते यांची दुचाकी अडविली. व काही कळण्याआत विसपुते यांना मारहाण सुरू केली व त्यांच्याकडील दागिण्यांचा ऐवज असलेली बॅग हिसकावली. या बॅगेत चार किलो चांदी, ५२ हजारांची रोकड तसेच मोबाईल असा सुमारे ९ लाखांचा ऐवज होता.
सराफा व्यापाऱ्याची लूट झाल्यानंतर चोरट्यांकडील दुचाकी जागेवरच बिघडल्याने चक्क चोरट्यांनी विसपुते यांची दुचाकी हिसकावून त्याद्वारे पळ काढला. या प्रकारानंतर विसपुते यांनी एरंडोल पोलिसात धाव घेत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी एरंडोल पोलिस ठाण्याला भेट देत घटना जाणून घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. याप्रकरणी अज्ञात तीन दरोडेखोरांना एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.