भडगाव : प्रतिनिधी
रस्त्यालगत पांड्या नाल्याजवळ दि. १० रोजी सायंकाळी ७ वाजता दोन तरुण शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. त्यात हे दोन्ही बचावले आहेत. आमडदे येथील रमाकांत पाटील आणि नितीन पाटील हे शेतात जात होते. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात दोन्ही शेतकरी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळच त्यांचे दुचाकी वाहन असल्याने त्यांनी त्वरित वाहनावरून पळ काढला म्हणून त्यांचा जीव वाचला. गावकऱ्यांना त्यांनी वार्ता कळविली त्यानंतर वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली.गेल्या दोन वर्षापासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. सहा महिन्यांपूर्वी नगराज रावबा पाटील यांच्या तरुण मुलावर बिबट्याने हल्ला चढविला होता. त्यात तो मुलगा बालंबाल बचावला होता वारंवार पाठपुरावा करूनही वन विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.