चाळीसगाव : प्रतिनिधी
रेल्वेत अडीच लाखांची चोरी करणाऱ्या अहिल्यानगर येथील तिघांच्या चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा ही समावेश असून त्याच्या आजीला समज देऊन त्याला ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली होती. अर्जुन ऊर्फ गोल्ट्या कानिफनाथ भोसले (२५, मारोती मंदिराजवळ धारनगाव, जि. अहिल्यानगर), अक्षय बाळासाहेब नन्नावरे (२३, धारनगाव) व एक अल्पवयीन मुलगा अशी या तिघांची नावे आहेत.
शीतल कैलास (चाळीसगाव) या एक्स्प्रेसमध्ये चढत पाखले धुळे-मुंबई असताना प्रवाशांच्या गर्दीत त्यांच्या खांद्यावर लटकवलेली पर्स अज्ञाताने चोरून नेली होती. या पर्समध्ये हिरव्या रंगाची कापडी पिशवी होती. या पिशवीत २ लाख ५० हजार रुपये, त्यांच्यासह पतीचे आधारकार्ड, पॅनकार्ड व दुचाकीची चावी होती. आपल्या पर्सची चोरी झाल्याचे कळताच त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या गुन्ह्यात लोहमार्ग विभागाच्या पोलिस अधीक्षक स्वाती भोर, मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत बांगर व प्रभारी अधिकारी सुरेश भाले, रेल्वे सुरक्षा बल येथील अधिकारी चित्रेश जोशी, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे सुरक्षा आयुक्त राजेशकुमार केसरी, अतुल टोके यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात आला.