जळगाव : प्रतिनिधी
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेली कार कमी किमतीत (डिस्काऊंट) मिळवून देण्याचे आमिष दाखवत विक्रम रमेश मुणोत (४२, रा. गणपतीनगर) यांची ३ लाख २५ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात राकेश सुभाष बडगुजर (४२, रा. आकुर्डी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम मुणोत यांची व्यवसायाच्या माध्यमातून एका कंपनीच्या जळगाव कार्यालयातील एरिया मॅनेजर राकेश बडगुजर याच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत राकेश बडगुजर याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना डिस्काऊंटमध्ये मिळणारी कार मुणोत यांना कमी किमतीत मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी मुणोत यांनी वेळोवेळी एकूण तीन लाख २५ हजार रुपये दिले. त्यानंतर बडगुजर याने नकार देऊन फसवणूक केली. याप्रकरणी विक्रम मुणोत यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहेत