मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. देशात कुठल्याही राज्याचे राज्यपाल करतो, असे आमिष दाखवून नाशिकच्या बारावी पास भामट्याने चक्क तामिळनाडूतील एका शास्त्रज्ञास ५ कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी (रा. गंधर्वनगरी, मोटवाणी रोड, नाशिकरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली.
फसवणूक झालेले नरसिम्मा रेड्डी अपुरी (रा. चेन्नई, तामिळनाडू) यांची याबाबत फिर्याद दिली होती. रेड्डी एका पूजेसाठी फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये आले होते. मुंबई नाका येथील एका हाॅटेलमध्ये निरंजन कुलकर्णी याच्यासोबत त्यांची तेव्हा एका मित्रामार्फत पहिल्यांदा भेट झाली. ‘माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत अोळख अाहे. मी कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो. या कामासाठी १५ कोटी रुपये घेतो,’ असे आमिष कुलकर्णीने रेड्डीला दाखवले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने आपल्या नावावर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांजवळील १०० एकर शासनाकडून लीजवर घेतलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रही दाखवले. काम झाले नाही तर या जमिनी तुमच्या नावे करेल, असेही कुलकर्णी सांगत होता. चांदशी येथील एका जमिनीचा आपल्या नावाचा बनावट सातबाराही त्याने दाखवला. त्यामुळे शास्त्रज्ञ असलेल्या रेड्डीचा विश्वास बसला. त्यामुळे रेड्डीने आपल्या व नातलगाच्या असोसिएट कंपनीच्या खात्यावरून फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ५ कोटी ८ लाख ९९ हजार रुपये कुलकर्णीला दिले. रक्कम घेताना संशयिताने जमिनीचे बोगस दस्तऐवजही दिले.
कालांतराने रेड्डी यांनी कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर ते खोटे असल्याचे समजले. त्यावर त्यांनी कुलकर्णी याच्याकडे पैसे मागितले, पण त्याने देण्यास नकार दिला. रेड्डी वारंवार संपर्क करू लागला असता संशयिताने त्याला जिवे मारण्याची फोनवरून धमकी दिली. दरम्यान, रेड्डींनी पोलिसात धाव घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कुलकर्णीला अटक केली.