भडगाव ; प्रतिनिधी
सध्या भडगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये गिरणा नदीपात्रातून जेसीबी मशिनद्वारा अवैध वाळूचे उत्खनन सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजता वलवाडी येथून एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर तसेच शनिवारी सकाळी ७ वाजता वाक येथील रस्त्यावर एक ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे.
ही दोन्ही वाहने भडगाव शासकीय आयटीआय येथे जमा करण्यात आली आहेत. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत महसूल विभागाच्या पथकात तलाठी सुनील मांडोळे, किरण मैंद, महादू कोळी यांचा समावेश होता. शनिवारी झालेल्या कारवाईत विवेक महाजन, गीतेश महाजन, महादू कोळी, योगेश पाटील यांचा समावेश होता. अवैध वाळू वाहतूकप्रकरणी अशीच धडक कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
शहरासह तालुक्यात गिरणा नदीपात्रातून अद्यापही वाळूची बिनधास्त वाहतूक सुरू आहे. तहसीलदार शीतल सोलाट यांनी अशीच कारवाईची मोहीम सुरू ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.