जळगाव : प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याची ४२ लाख १५ हजार रुपयांमध्ये, तर निवृत्त लिपिकाला खोटे कागदपत्र पाठवून गुन्ह्याची धमकी देत १८ लाख रुपयांमध्ये फसणूक करण्यात आली. दोघांना एकूण ६० लाख १५ हजार रुपयांमध्ये गंडविण्यात आले असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय शेतकऱ्याशी एका जणाने १३ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर यादरम्यान संपर्क साधून एका अॅप्लिकेशनद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये अॅड केले. त्यात त्यांना शेअर ट्रेडिंगविषयी माहिती देऊन त्याद्वारे अधिक नफ्याचे आमिष दाखविले.
सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सहा लाख रुपये नफा देण्यात आला व त्यातून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ते गुंतवणूक करीत गेले. मात्र, त्यांना परतावा मिळत नव्हता. असे करता- करता वेळोवेळी शेतकऱ्याने एकूण ४२ लाख १५ हजार रुपये समोरील व्यक्तीच्या बँक खात्यात आरटीजीएस व एनईएफटीद्वारे भरले. मात्र, नंतर त्यांना नफा तर दूरच मुद्दल रक्कमही परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिथिका देवी नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झाल्याने संबंधित निवृत्ताने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ७ डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.
एका शिक्षण संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याशी १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीप राव असे नाव सांगणाऱ्यांनी संपर्क साधला. निवृत्तास कारवाई, गुन्ह्याची धमकी देत न्यायालयाची खोटी ऑर्डर व इतर खोटे कागदपत्रे त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले. त्यामुळे निवृत्त कर्मचारी घाबरला व त्याच्याकडे समोरील व्यक्तींनी ऑनलाइन पैसे पाठविण्याची मागणी केली. त्यामुळे वेळोवेळी निवृत्ताने एकूण १८ लाख रुपये आरटीजीएसद्वारे भरले.