जळगाव : प्रतिनिधी
मध्यरात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात शिरुन महिलेला घर देण्यावरुन वाद झाला. यावेळी अंजूमबी फिरोज खान (वय ४०, रा. ख्वॉजा नगरी, पिंप्राळा हुडको) यांना कय्यूम शेख यांनी पकडून ठेवले. तर त्यांची पत्नी मेहुरुनिसा शेख हीने महिलेच्या हाताचा चावा घेत जखमी केले. ही घटना दि. २९ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वॉजा नगरीत अंजूम बी फिरोज खान या महिला वास्तव्यास आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या परिसरातील मेहरुनिसा शेख व तिचा पती कय्यूम शेख हे त्यांच्या घरात घुसले. त्यांनी महिलेला माझे घर देवून दे असे म्हटले असता, अंजूम बी यांनी हे माझे घर आहे. ते मी देणार नाही असे बोलल्या. त्याचे वाईट वाटल्याने दाम्पत्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कय्यूम शेख यांनी महिलेला पकडून ठेवले तर मेहुरुनिसा शेख यांनी महिलेच्या हाताला कडकडून चावा घेतला. यामध्ये महिला जखमी झाल्या असून त्यांनी दि. ६ रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.