जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवार दि.६ डिसेंबर रोजी काढले. दरम्यान गॅस रिफलींग स्फोट प्रकरण त्यांना भोवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून दत्तात्रय निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ११ जण भाजले गेले होते. यातील सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जोरदार टीका सुरू होती. त्यामुळे निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
घटना घडली त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. आचारसंहिता संपताच बदली विषयी हालचाली गतिमान झाल्या. अखेर शनिवारी पोलिस निरीक्षक निकम यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. येथील पदभार दुय्यम अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.