जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमीनी गाडी व दोन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात चोपडा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील सुंदरगढी परिसरातील शुभम पारधी (वय २०), लोहिया नगरमधील विजय बाळू पाटील व शिवाजी नगरमधील एक अशा तिन जणांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टॅक्सीमधील बसलेला प्रवाशी ज्ञानेश्वर सोनार (रा. सुरत) याला डॉ. सुमित सूर्यवंशी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका जखमीला धुळे येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. तर इतर जखमींना खासगी रुग्णालयात उपाचारार्थ नेण्यात आले आहे. दरम्यान, चोपडा येथील सहा जण मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट दुचाकी (एमएच-१९, डीएल-८६९३) तसेच दुसरी एक दुचाकीने ट्रीपलसीट चोपडा शहराकडे निघाले होते. तर चोपड्याकडून मारुती व्हॅन ही टॅक्सी (एमएच १९, वाय- १८२८) येत होती. या वेळी टॅक्सीमध्ये जवळपास १२ प्रवाशी होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, दहिवद फाट्याजवळ समोरून दोन्ही दुचाकी वेगाने येत होत्या. या वेळी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही दुचाकींची जबर धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंगमध्ये अडकले होते. तर दोन्ही दुचाकी रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या होत्या. शनिवारी रात्री ८ वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जखमी ग्रामीण रुग्णालयात मयत झाला. तसेच या अपघातातील जखमी विजय महाजन यांना धुळे येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.