मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाल्याने हा पाऊस पडत आहे. दरम्यान आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्राकार वारे देखील पुढे सरकल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार आता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेच्या काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक भारतीय हवामान विभागाने आज कुठेही पावसाचा अलर्ट दिलेला नाही. तर केवळ मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा सडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात थंडीची लाट पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता. त्यामुळे या काळात थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला होता. तर उकाडा देखील वाढला होता. मात्र, आता राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे आगामी तीन दिवसात हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नऊ डिसेंबर पर्यंत राज्यातील बहुतांश भागात शुष्क आणि कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.