मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने दोन दिवसापूर्वी शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला असून राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कालच शपथ घेतली. नऊ वेळा आमदार राहिलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात शपथ दिली. आता कोळंबकर हे सर्व आमदारांना विधानभवनात शपथ देतील.
हंगामी सभापती झाल्यानंतर कोळंबकर हे विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. तसेच 9 डिसेंबर रोजी 15 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विश्वासदर्शक ठराव मांडेल. महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने हा ठराव सहज जिंकतील.
यापूर्वी 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे-अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. निवडणुकीच्या निकालानंतर 13 व्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला. मोठ्या विचारमंथनानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. काँग्रेस, महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहेत.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या वेळी ते म्हणाले होते की, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण केला जाईल आणि त्यांचे खाते वाअप देखील केले जाईल. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे 11 ते 12 डिसेंबर दरम्यान मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे संकेतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद द्यायचे की नाही हे सभापती ठरवतील. आपल्या भूमिका बदलल्या आहेत, दिशा बदलली नाही. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे. यामध्ये फारसे बदल होणार नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.