जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने दोन दिवसापूर्वीच शपथविधी घेतला असून यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे दिग्गज नेते आता अजित पवार गटाच्या काही नेत्यांच्या संर्पकात असल्याची बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत गुलाबराव देवकर यांनी ५ रोजी सकाळी १०.३० वाजता भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ही गुलाबराव देवकर यांचा संपर्क झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाला श्रेष्ठींनी हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला होता. तर चार दिवसांपूर्वीच गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले होते. तसेच अजित पवार यांच्या गटात प्रवेश करा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी यांनी थेट अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन चर्चा केली, गुलाबराव देवकरांसह आम्ही पक्ष प्रवेश करु इच्छितो, असे सांगितले होते. त्यावर अजित पवार यांनी गुलाबराव आप्पांचे काय म्हणने आहे? त्यांची प्रवेश करण्याची इच्छा आहे का? अशा शब्दात विचारणा केली. त्यानंतर ५ रोजी सुनील तटकरे यांची गुलाबराव देवकर यांनी मुंबईत भेट घेतली आणि पक्ष प्रवेश निश्चित केला आहे. दोन दिवसात पक्ष प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.