जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करून सावखेडा सिम-दहिगाव भागात कमी दरात विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील चोरीच्या तब्बल ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ बशीर पटेल (रा. पटेल वाडा, दहीगाव, ता. यावल) असे या अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जळगाव येथून चोरीस गेलेल्या मोटरसायकलीच्या तपासासाठी जळगाव शहर पोलिसांनी दहिगाव गाठले. दहिगावातील पटेल वाड्यात रहिवास करीत असलेला आसिफ यास बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी केली. त्यावेळी त्याने चोरून आणलेल्या मोटारसायकली ज्या-ज्या लोकांना कमी दरात विक्री केल्या, त्यांची नावे त्याने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्वरित त्या लोकांच्या घरून मोटारसायकली ताब्यात घेतल्या. पोलिसांनी ११ मोटरसायकली हस्तगत करून त्या जळगाव शहर पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत.
आसिफ हा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जळगाव भागातून दुचाकी चोरून दहिगाव व सावखेडा सिम व ग्रामीण भागात विक्री करीत होता. चांगल्या परिस्थितीत असलेली मोटार सायकल आठ ते दहा हजार जास्तीत जास्त १५ हजारापर्यंत विक्री करीत होता. हे पोलिसांच्या निदर्शनास आले. जळगाव शहर पोलिस ठाण्याचे फौजदार राजू जाधव, कॉ. सतीश पाटील, उमेश भांडारकर, राहुल पांचाळ, अमोल ठाकूर हे तपास करीत आहेत. या प्रकरणात आणखी काही मोटारसायकली मिळतील असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे. जळगाव पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.