भुसावळ : प्रतिनिधी
पोलिस असल्याची बतावणी करीत महिलेच्या अंगावरील दोन लाख ६५ हजारांचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविले. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगरजवळ घडली. दोघा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपनगरजवळ दोघा अनोळखींनी वसंत जगन्नाथ पाटील (७९, रा. वेडीमाता मंदिर, खळवाडी, आदर्शगल्ली, भुसावळ) यांची अॅक्टिवा गाडी थांबवून त्यांना पोलिस असल्याचे सांगितले. आता एका वृद्धेचे दागिने लांबविण्यात आले. तुम्ही इतके दागिने घालून कोठे जात आहात, अंगावरील सोने काढून ठेवा, असे सांगितले. वसंत पाटील यांनी पदमावती पाटील यांचे दागिने रुमालात काढले, सोबत कागदपत्रेसुद्धा रुमालात ठेवली. रुमाल बांधला व रुमाल डिक्कीत नीट ठेवतो, असे सांगून हातचलाखीने दोन लाख ६५ हजारांचे दागिने घेऊन भामटे पसार झाले. वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहेत.