जळगाव : प्रतिनिधी
सीमा तपासणी नाक्यावर नियुक्तीच्या मोबदल्यात पंटरला लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देत त्याच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसम (पंटर) भिकन भावे याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तसेच जळगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे त्यांना अटक होऊ शकली नाही. दरम्यान, सीमा नाक्यांवर झालेल्या नियुक्त्यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर सीमा तपासणी नाक्यावर नियुक्तीच्या बदल्यात आरटीओ दीपक पाटील यांनी पंटर भिकन भावे याला तीन लाख रुपयांच्या लाचेसाठी प्रोत्साहन दिले व त्यानुसार लाच मागण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दुसरा संशयित भिकन भावे याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आले.
शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. दीपक पाटील यांना मध्यरात्री दीड वाजता वार्ड क्रमांक ९मध्ये (कैदी वार्ड) दाखल करण्यात आले. त्यांची वेळोवेळी ईसीजी केले जात असल्याची माहिती डॉ. अमित भंगाळे यांनी दिली. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागल्यास तसाही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.