अमळनेर : प्रतिनिधी
तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृण खून करण्यात आल्याची घटना मंगरूळ (ता. अमळनेर) येथील औद्योगिक वसाहत भागात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाच्या पत्नीस ताब्यात घेत तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे. तुषार चिंधू चौधरी (३७) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चौधरी (३०) व तिचा प्रियकर सागर अरुण चौधरी (३०, रा. मालपूर, दोंडाईचा) अशी संशयितांची नावे आहेत. तुषार हा ५ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास १० मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही, म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्याचे मोबाइल लोकेशन मंगरूळपर्यंत दाखवत होते. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना माग लागला. शुक्रवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास तुषार हा मंगरूळ येथे जखमी अवस्थेत आढळून आला. पोलिस पाटील भागवत पाटील यांनी पोलिसांना या घटनेची माहिती कळविली. तुषार याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. प्रभारी डीवायएसपी धनंजय वेरूळे, पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोलिस उपनिरीक्षक युवराज बागुल यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे