एरंडोल : प्रतिनिधी
दुचाकी व टीव्ही चोरीच्या दोन घटनांना आठवडा उलटला नाही, तोच कुलूपबंद घरात चोरट्यांनी पुन्हा संधी साधली आहे. अज्ञात चोरट्यांनी ओमनगर येथे कटरने कडीकोयंडा कापून दोन घरांमध्ये चोरी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील ओमनगरामधील भटू चौधरी हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी कटरने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून २५ हजार रुपये रोख व ३ ते ४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. त्याच परिसरात प्राचार्य अनिल पाटील यांच्या कुलूपबंद घरात आधी चॅनेलगेट तोडले. नंतर घराचा कडी कोयंडा तोडण्यात आला. मात्र, किरकोळ पैसे वगळता चोरांच्या हाती काहीएक लागले नाही. नंतर प्राचार्य अनिल पाटील यांच्या शेजारी असलेल्या निवृत्त प्रा. आर. एम. पाटील यांच्या घरी कडीकोयंडा तोडण्याचा चोरांचा प्रयत्न असफल झाला. कुलूप लावलेल्या घरात चोरी करण्याच्या या प्रकाराची पुनरावृत्ती होत असल्यामुळे कुलूप लावून परगावी जाताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.