जामनेर : प्रतिनिधी
कुटुंब लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने व ३५ हजाराची रोकड असा सुमारे १ लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना नेरी बुद्रुक (ता. जामनेर) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश भगवान पाटील (ग्यानपार्क, नेरी बुद्रुक) हे नातेवाईकाच्या लग्नासाठी मंगळवारी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. गोरज मुहूर्ताचे लग्न असल्याने निघण्यास उशीर होणार असल्याने ते मुक्कामी राहिले.
बुधवारी सकाळी त्यांना त्यांच्या मित्राचा फोन आला की, तुमच्या घरात चोरी झाली आहे. पाटील यांनी तातडीने नेरी गाठले. चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. कपाटातील ५७ हजाराचे सोन्याचे दागिने, ४ हजार ४०० किमतीचे चांदीचे दागिने व ३५ हजार रोख असा ९६ हजार ४०० चा मुद्देमाल लांबविल्याचे दिसून आले. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वाढत्या चोरी व रस्ता लुटीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे