जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर मतदारसंघात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरावर गोळीबाराची घटना मेहरुण परिसरात १८ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात या उमेदवारानेच मुलगा, शालक व त्याच्या मित्राच्या मदतीने सहानुभूती मिळविण्यासाठी स्वतःच्या घरावर गोळीबार केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. यात उमेदवारासह तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मिल्लालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून मेहरुण परिसरातील शेरा चौकात राहणारे निवृत्त शिक्षक अहमद हुसेन शेख (वय ५०) यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. निवडणुकी दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता शेख कुटुंबीय साखर झोपेत असतानाच दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी घरावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत घराच्या खिडकीची काच फुटली होती. ऐन निवडणुकीत झालेल्या या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत याप्रकरणी अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेख अहमद शेख हुसेन याने विधानसभेच्या निवडणुकीत एका पक्षाकडून तिकीट मागितले होते. मात्र, पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून त्यानेच आपल्या शालकाकडून घरावर गोळीबार केला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
१८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संबधित उमेदवाराने दीड तासांपर्यंत पोलिसांना घटनेची माहिती दिली नव्हती. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास केला असताना, घटना पहाटे घडल्यानंतरही ही माहिती उशिरा पोलिसांना दिल्यामुळे या गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांचा संशय बळावला. त्याच दृष्टीने पोलिसांनी चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे.