जळगाव : प्रतिनिधी
नवापूर येथील सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती दिल्याबदल्यात तीन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयातील खासगी पंटर भिकन भावे याला गुरुवारी दुपारी ३:३० वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवत जळगाव आरटीओ दीपक पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नवापूर येथील सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती केल्याप्रकरणी तीन लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. आरटीओ दीपक पाटील यांनी लाच देण्यास प्रोत्साहन दिल्यानंतर खासगी इसम भिकन मुकुंद भावे (वय ५२, रा. आदर्शनगर, जळगाव) याने तक्रारदार यांच्या मेहरून तलावाजवळील घरी ही लाच पंचासमक्ष स्वीकारली.
या प्रकरणी पथकाने आरटीओ दीपक पाटील व खासगी इसम भिकन भावे या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल धस, उपनिरीक्षक सुरेश नाईकवरे यांच्या पथकाने केली.