चोपडा : प्रतिनिधी
धरणगाव रोडवरील हॉटेलजवळ दोन वाहनांतून अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर चोपडा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चार गुरे आणि दोन वाहने असा एकूण १८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली असून, याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-धरणगाव रस्त्यावरून दोन वाहनांतून अवैधरीत्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. हॉटेलजवळ थांबून पोलिसांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता (एमएच२०/सीजी९२४५), (एमएच१५/एचएच३८८५)या क्रमांकाची दोन वाहने गुरांची वाहतूक करताना आढळून आली. चालक योगेश श्रीधर वैष्णव (३१, मंगरूळ, जि. छत्रपती संभाजीनगर), ज्ञानेश्वर खंडू रिसवाल (२५, आडगाव, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोघांविरूध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास चोपडा पोलिस करत आहेत.