जळगाव : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पसार होऊन सतत ठिकाण बदलवित असलेला समाधान रमेश सपकाळे हा मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून विभक्त राहणाऱ्या माधुरी सपकाळे (रा. खेडी, ता. जळगाव) या महिलेवर तिचा पती समाधान सपकाळे याने ७ नोव्हेंबर रोजी चाकूने डोक्यात, हाता-पायावर वार करून गंभीर दुखापत केली होती. त्यावेळी मुलगा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण केली. पत्नी मयत झाल्याचे समजून समाधान तेथून पसार झाला होता. या हल्ल्यात माधुरी यांना गंभीर दुखापत होऊन ९२ टाके पडले होते. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेच्या दिवसापासून समाधान सतत वेगवेगळ्या ठिकाणी जात होता. त्यामुळे त्याचा शोध घेताना अडचणी येत होत्या. तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यांनी पोउनि शरद बागल, पोलिस नाईक योगेश बारी, किशोर पाटील, पोकों छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने एरंडोल तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ समाधान याला ताब्यात घेतले.