धरणगाव : प्रतिनिधी
महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी सात वाळूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आव्हाणी, ता. धरणगाव शिवारात मंगळवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली.
अक्षय पाटील, उज्ज्वल पाटील, गणपत नन्नवरे, सोनू नन्नवरे, विशाल सपकाळे, किरण राजपूत आणि नाना पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या वाळू माफियांची नाव आहेत. धरणगाव तालुक्यातील सोनवद विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर है मंगळवारी आपल्या पथकासोबत आव्हाणी ते बांभोरी प्र.चा असे गस्तीवर होते. त्यावेळी आव्हाणी शिवारातील गिरणा नदी पात्रात वरील सातही जण अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. अधिकारी बाविस्कर यांच्यासह त्यांच्या पथकासोबत हुज्जत घातली. यानंतर महसूलच्या पथकाने गावातील सरपंच जानकीराम दामोदर पाटील आणि आव्हाणीचे पोलिस पाटील यांना घटनास्थळी बोलवले. परंतु तरीदेखील वाळूमाफिया ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
या सर्व गोंधळात एका संशयिताने वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. यावेळी महसूल विभागाच्या पथकाने सात ट्रॅक्टर ट्रॉलींसह साडेसहा ब्रास वाळू असा एकूण ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी धरणगाव पोलिसांत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.