जळगाव : प्रतिनिधी
गिरणा पंपिंग प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून नेताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. हा धक्कादायक प्रकार २ डिसेंबर रोजी गिरणा पंपिंग रस्त्यावर आर्यन पार्कसमोर भरदिवसा सुरू होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आले असून त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.
गिरणा पंपिंग प्लांटवरून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या ही योजना बंद आहे. गिरणा पंपिंग रस्त्यावर जेसीबीद्वारे चारी खोदून बीडाचे पाइप काढण्यात येत असल्याची माहिती ठेकेदार सुमीत सोनवणे यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांना दिली. बोरोले यांनी पंप अटेंडंट नरेश चंद्रात्रे, कर्मचारी अनिल पाटील यांना तेथे पाठविले. त्यांना नरेंद्र निवृत्ती पानगळे (३०) व रवण चव्हाण (दोघे रा. शिरसोली, ता. जळगाव) हे दोन जेसीबीच्या (क्र. एमएच. ३२, पी. ३८५५) साहाय्याने जुनी पाइपलाइन खोदून बीड धातूचे पाइप काढत असल्याचे आढळले.पाइप काढणाऱ्यांची चौकशी करीत असताना चव्हाण याने तेथून पळ काढला. त्या ठिकाणी अक्षय अग्रवाल नामक व्यक्ती पोहोचला. ही पाइपलाइन अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांच्या सांगण्यावरून खोदली असल्याची माहिती जेसीबी मालक व चालक पानगळे याने दिली.