जळगाव : प्रतिनिधी
विना परवानगी बॅनर लावून शहर विद्रूप केले म्हणून महापालिकेने सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ६८ बॅनर काढून जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेने २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली, त्यात ही कारवाई करण्यात आली.
विधानसभा निवडणूक लागू होताच शहरातून राजकीय पक्षांचे बॅनर्स, झेंडे व होर्डिंग्ज हटविण्यात आले होते. निवडणुकीची आचारसंहिता संपताच अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणात लागले होते. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथक व किरकोळ वसुली विभागाला संयुक्त मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारही प्रभागांत २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली. यात विना परवानगी लागलेले राजकीय पक्षांसह विविध व्यवसायांचे बॅनर्स हटविण्यात आले.