मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील माळेगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. २) रात्री घडली. बोदवड मुक्ताईनगर हा रहदारीचा रस्ता ओलांडताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी ८ ते साडेआठच्या दरम्यान माळेगाव वनविभागातील वनपाल व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता घटना स्थळावर दोन ते तीन वर्षे वयाची निलगाय मृतावस्थेत आढळून आली. निलगायचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. घटनास्थळावर पंचनामा करून मृत निलगायचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर माळेगाव वनविभाग हद्दीत निलगायचा दफन विधी करण्यात आला, अशी माहिती माळेगाव वनविभागाचे वनपाल डी. ए. जाधव यांनी दिली.