भडगाव : प्रतिनिधी
गुढे येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या जामदा कालव्यावरील पुलाचे काम अपूर्ण असून, या ठिकाणी मका घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली सोमवारी उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, मक्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गुढे येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या जामदा डाव्या कालव्यावरील हा पूल १० ते १२ महिन्यांपासून पाडण्यात आला आहे. नवीन पुलाचे बांधकाम चाळीसगाव सा. बां. विभागाच्या देखरेखीखाली सुरू झाले असून, हे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे गुढे परिसरातील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता खेडगाव, ता. चाळीसगाव येथील शत्रुघ्न पिंजारी यांच्या शेतातील मका काढून वजन करण्यासाठी खेडगाववरून तीन ट्रॅक्टर बहाळ येथे घेऊन जात असताना त्यापैकी एक ट्रॉली या कालव्यावरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी उलटली. पाइप टाकून बनविलेल्या कच्च्या रस्त्यावरून जात असताना रस्ता खचल्यामुळे ही ट्रॉली थेट कालव्यात उलटली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
गढे येथील बहतेक शेतकरी हे लिंब ऊस उत्पादक असून, सध्या लिंबू माल ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच दुचाकीने घरी आणत आहेत; परंतु, पाइप टाकून पर्यायी बनविलेल्या अरुंद कच्च्या पुलावरून प्रवास करताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. कच्च्या पुलाच्या पलीकडे खेडगाव रस्त्यालगत गुढे येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. ऊस काढणीचा हंगाम सुरू झाला असून, ऊसतोड सुरू झाली आहे. तोडलेल्या पुलाच्या पलीकडे एरंडोल-येवला राज्यमार्ग आहे. मात्र, पुलाचे काम होत नसल्याने उसाचे भरलेले ट्रक, ट्रॅक्टर मोठ्या फेऱ्या मारून घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा आणि ऊस तोडणाऱ्या मुकादमाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे