जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील लाडक्या बहिणींनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस यश दिले आहे. आता लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणार की २१०० रुपये याची उत्सुकता लागली आहे. सरकार येताच आम्ही २१०० रुपये देऊ असे आश्वासन या बहिणींना महायुती सरकारने दिले होते. आतापर्यंत दीड हजार प्रमाणे पाच हप्ते मिळालेले आहेत. जळगाव जिल्ह्यात सव्वा पाच लाख लाडक्या बहिणी आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पैसे लागलीच मिळण्याची आशा मावळली आहे.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा रंगत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता.
सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात जमा केले होते.