पारोळा : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे फाट्याजवळ सोमवारी दुपारी झालेल्या दोन कारच्या भीषण अपघातात सुरत येथील दाम्पत्य ठार झाले. या अपघातात नाशिक येथील चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर देविदास पाटील (४७) आणि ज्योती सुधीर पाटील (४२, रा. सुरत) असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ते पुतणीच्या लग्नासाठी सुरत येथून कारने लोणी बुद्रुक (ता. पारोळा) येथे येत होते. अपघातस्थळापासून लोणी बुद्रुक फक्त आठ किलोमीटर अंतरावर होते सुधीर पाटील हे सुरत येथील किराणा मालाचे व्यापारी होते. ४ रोजी पुतणीचा विवाह असल्याने पाटील दाम्पत्य कारने सुरत येथून लोणी बुद्रूक येथे येत होते. वाटेत म्हसवे फाट्याजवळून ते लोणी बुद्रूक गावाकडे वळण घेत असताना जळगावहून पारोळ्याकडे जाणारी दुसरी कार त्यांच्या कारवर जाऊन आदळली. त्यात सुधीर व ज्योती पाटील हे जागीच ठार झाले तर धडक देणाऱ्या कारमधील शिरीष लढ्ढा (४०), उमेश लहाने (४२), चालक प्रवीण तागड, मिरज चांदे (सर्व रा. नाशिक) हे जखमी झाले.
परिसरातील नागरिक व गावकऱ्यांनी जखमींना बाहेर काढले. अपघातात पाटील यांच्या कारचा चक्काचूर झाला. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.