मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचा सरकार स्थापन करण्याचा तिढा अजून सुटला नसून भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. पण महायुतीला या सरकारचे नेतृत्व कोण करणार? याविषयीची उत्कंठा अद्याप संपली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तातडीने दिल्लीला जाणार आहेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या नाराजीकडे कानाडोळा करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. त्यानंतर 23 तारखेला निकाल लागला. त्यात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. पण यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महायुतीच्या सरकारच्या संभाव्य खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्या वाट्याला 9 मंत्रीपदे आली होती. यावेळी ही त्यांना एवढीच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आजच्या बैठकीत अमित शहांसोबतच्या बैठकीत आणखी एखाद-दोन मंत्रिपदासाठी आग्रह धरतील अशी माहिती आहे.