जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेणार आहेत. तसेच याबाबत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय आधीच मान्य असणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा कोणत्याही नाराजीचा प्रश्न येतच नाही. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
रविवारी पाळधी येथील निवासस्थानी गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. ‘महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘जे शेतात राहतात, ते शेतात जातील, जे महालात राहतात त्यांना काय कळणार?’ असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे; तर आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत, त्यांना काय माहीत, शिवसेना ज्यांनी मोठी केली ते आज कुठे आहेत? आम्ही आंदोलने केले तेव्हा शिवसेना मोठी झाली. त्यांच्या महालात आमचीही वीट आहे. हे त्या विटांना विसरले आणि संजय राऊतसारखा माणूस त्यांनी आणला.
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी ओळखावे. नाही तर संजय राऊत यांच्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या वीसपैकी दहा आमच्याकडे यायला तयार आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.