जळगाव : प्रतिनिधी
मेडिकलचा व्यवसाय नीरज करणारा प्रभाकर चव्हाण (वय २७, रा. चहार्डी, ता. चोपडा ह.मु. भुसावळ) हा तरुण शुक्रवारी रात्री आठ वाजेनंतर जळगाव शहरातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला असून, त्याची दुचाकी व मोबाइल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मिळून आले आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून व्यवसायाशी संबंधित दोघांसह दुचाकीसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हमाल अशा तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज चव्हाण व त्याचे दोन मित्र अशा तिघांनी भुसावळ येथे मेडिकलचा व्यवसाय सुरू केला. नेरी नाका परिसरात एका एजन्सीशी त्यांचा दैनंदिन संबंध असल्याने त्यांचे तेथे येणे जाणे होते. काही दिवसांपासून व्यवसायातून तिघांमध्ये धुसफुस सुरू झाल्याने महिन्याभरापासून चव्हाण हा या मेडिकल एजन्सीचे काम सांभाळत होता. सातत्याने वाद होत असल्याने व्यवसायात एकत्र रहायचे की नाही याचा अंतिम निर्णय शनिवारी घेण्याचे 1. ठरले होते. शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता नीरज याने एजन्सीचे दुकान बंद केले. त्याच वेळी त्याला एकाचा फोन आला. त्यानंतर नीरजचा संपर्क तुटला. पत्नी व कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली.
पोलिस व कुटुंबियांनी केलेल्या चौकशीत शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजची दुचाकी व मोबाइल कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मिळून आली. ही दुचाकी एक हमाल आणताना सीसीटीव्हीत दिसून आला. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, मी मद्याच्या नशेत होतो. मला कोणी तरी दारूचे आमिष दाखवून ही दुचाकी या ठिकाणी लावायला सांगितली. त्यानुसार ती पार्किंग केली अशी माहिती त्याने तपासात दिल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले. मोबाईलवर अनेक कॉल आलेले आहेत, मात्र साडेसातनंतर एकही कॉल रिसीव्ह झालेला नाही. व्यवसायाशी संबंधित दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व शक्यतांची पडताळणी केली जात असल्याचे निरीक्षक निकम यांनी सांगितले.