नागपूर : वृत्तसंस्था
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. भंडारा- गोंदिया शिवशाही बसला हा अपघात झाला असून त्यात सुमारे १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३० ते ३५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनास्थळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
आज शुक्रवारी सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बसचे गोंदियाला जात असताना सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी पुढे नमूद केले आहे.