चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यात काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी चोपडा पोलिसांनी तपास करीत धरणगाव तालुक्यातील एकास अटक करीत त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील अंजाळा येथील रहिवासी यादवराव बाबूलाल पाटील यांची दुचाकी चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारातून चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत चोपडा पोलिसांनी पवन प्रेमचंद पाटील (२८, रा. आव्हाने, ता. धरणगाव) यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातून चोरीस गेलेल्या दुचाकींचा तपास करताना संबंधित आरोपी हा शहरात एका हॉटेलवर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, अनिल भुसारे, पोलिस संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, नीलेश वाघ, विनोद पाटील यांनी शिताफीने आरोपीस अटक केली. त्याची विचारपूस केली असता त्याने आणखी चार मोटरसायकलची चोरी केल्याबाबत कबुली दिली. या मोटरसायकल सुरत, सेंधवा, जळगाव येथून चोरी केल्या होत्या. सर्व मोटारसायकली चोपडा तालुक्यातील गूळ नदीच्याकाठी झाडांमध्ये लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले. पोलिसांची टीम आरोपीस घेऊन घटनास्थळी गेली असता त्याने लपवलेल्या सर्व गाड्या मिळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे