मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे तर महायुतीला मोठं यश मिळालं आहे. २८८ जागांपैकी २३९ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निश्चित झालं आहे. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर भुजबळांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
‘ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं’, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. यासह मागासवर्गीय आणि ओबीसींसाठी काम केल्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय, असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘१३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे.
त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला आणि स्वतःला झोकून दिलं. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाही.’