नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीला मोठे यश आले आहे त्यासाठी राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मुहूर्त ठरत आहे तर विदर्भात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची तुतारी नऊपैकी एकाही ठिकाणी वाजू शकली नाही. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे माजी मंत्री रमेश बंग, काटोलमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यासह सर्व जागी त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. या उलट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार निवडून आल्याने दादा गटाने पवार गटाला डिवचले आहे.
शहर अध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी आज माजी मंत्री, विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर जीपीओ चौक परिसरात लावलेल्या बॅनरमधून राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजितदादा.. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. निवडून आलेल्या दहा आमदारांनी देखील अजित दादाच आता वाली….! अजितदादा यांचे नेतृत्व मान्य करावे अशा आशयाचे लावलेले पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहे. यापूर्वी देखील अजित दादा पवार यांच्या विजयगड निवासस्थान परिसरात तसेच मुख्यमंत्रिपदावरून अजितदादा समर्थकांनी लावलेले होल्डिंग चर्चेचा विषय ठरले होते.