रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडा येथे निवडणूक ड्युटीवर असताना एका होम गार्डच्या बोटास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. या होमगार्डला वर्गणी करून सावदा पोलिसांनी मदतीचा हात दिला.
२० रोजी विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यात पोलिस खात्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्यूटी लावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत पण ड्युटी लावण्यात आल्या. त्यात वाघोदा येथे होमगार्ड कर्मचारी सुखदेव दयाराम धनगर (मुक्ताईनगर पथक) हे ड्युटीवर असताना त्यांच्या बोटावर दरवाजा आदळून अंगठ्याच्या भाग नखापासून वेगळा होऊन गंभीर दुखापत झाली.
यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर वाघोदा येथे प्राथमिक उपचार करून पुढील शस्त्रक्रिया कामी अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेसाठी सावदा पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार व पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ४३ हजार रुपये जमा करून सामाजिक बांधिलकी दाखवत जखमी होमगार्डला मदत केली. या सामाजिक कार्यासाठी सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, पीएसआय अमोल गर्ने यांनी पुढाकार घेतला. याबद्दल सर्व पोलिस टीमचे परिसरातून कौतुक होत आहे. धनगर यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने उपचाराचा खर्च कसा करावा? असा प्रश्न त्यांच्या परिवारापुढे होता. ही मदत मिळाल्याने धनगर परिवाराने सावदा पोलिसांचे आभार मानले.