फैजपूर : प्रतिनिधी
तीस हजारांची लाच घेणारा खासगी पंटर किरण सूर्यवंशी याला भुसावळ न्यायालयाने २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक किरण सोनवणे (भुसावळ) हा अद्यापही फरार आहे.
३० हजारांची लाच घेताना २३ रोजी या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करू नये म्हणून ५० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार ही ३० हजारांची लाच स्वीकारताना खासगी पंटर किरण सूर्यवंशी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते तर यातील मुख्य आरोपी उपनिरीक्षक किरण सोनवणे, हा फरार झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने किरण सूर्यवंशी याला शनिवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. यातील आरोपींची संख्या वाढू शकते, असेही सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.