मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून उद्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल आम्ही प्रत्येक मतदारसंघ निहाय आढावा घेतला. त्यानुसार आम्ही किमान 160 जागा जिंकत असल्याचे लक्षात आले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘सर्व्हेची ऐसी की तैसी’ असे म्हणत संजय राऊत यांनी एक्झिट पोल मधील केलेले सर्व दावे फेटाळले आहेत.
ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येत असतात. आमच्या सोबत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत. काही अपक्ष उमेदवारांनी देखील आम्हाला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सत्ता स्थापन करत असताना आपण सत्तेत सहभागी व्हावे, असे छोट्या पक्षाची इच्छा असते. त्यामुळे सर्वांना सोबत घेणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला.
आतापासूनच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उमेदवारांना 50 – 50, 100-100 कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना जिंकण्याची खात्री नाही. ज्यांना जिंकण्याची खात्री नसते तेच पैसे द्यायला तयार होतात, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. त्यांना विजयाची अपेक्षा नसती तर त्यांनी पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.
मतदानाच्या आकडेवारी मध्ये अचानकपणे वाढ होते. हरियाणामध्ये देखील तसेच झाले होते. त्यामुळे हा काय खेळ आहे? हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजून सांगायला हवे. अचानक दोन-चार टक्के मतदान कसे वाढते? आणि अचानकपणे भारतीय जनता पक्षाच्या जागा कशा वाढतात? हे आम्हाला निवडणूक आयोगात बसलेल्यांनी समजून सांगावे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.